नवी मुंबई - तळोजा फेज वन सेक्टर 9 मधील शिव कॉर्नर सोसायटीतील बंद घरात शनिवारी (दि. 22 फेब्रुवारी) सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. या हत्या व आत्महत्या प्रकरणी मृत उपाध्येय कुटुंबातील नातेवाईकांशी संपर्क झाला आहे. या कुटुंबीयांच्या नातेवाईकांची आणि इमारतीमधील रहिवाशांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती, तळोजा पोलिसांनी दिली.
मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असणारे व त्यानंतर दिल्लीत वास्तव्य करणारे नितेश कुमार उपाध्येय (वय 35 वर्षे) यांनी आपली पत्नी बबली उपाध्येय (वय 30 वर्षे), मुलगी नव्या उपाध्येय (वय 8वर्षे) व मुलगा ओम उपाध्येय (वय 7 वर्षे) यांची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला होता. यासंदर्भात मृत नितेश कुमारच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. नितेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आमचे कोणीही नातेवाईक नाहीत, आमच्या मृतदेहाचे हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार करावे, अशा प्रकारची भावनिक विनंती चिठ्ठीत केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी आपली सूत्र हलविण्यास सुरुवात केली असून, पोलिसांना उपाध्येय कुटुंबीयांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास यश आले आहे. आज त्यांचे नातेवाईक दिल्लीतून तळोजा येथे येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चौघांचे मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात येणार असून या आत्महत्येसंदर्भात नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली आहे.
नितेश यांचे कुटूंब इमारतीत शेवटचे डिसेंबर महिन्यात वावरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. मात्र, संपूर्ण कुटूंब एकाएकी दिसेनासे झाले. दोन महिन्यांपासून या कुटुंबातील लोकांचे मृतदेह घरात असूनही सोसायटीमधील रहिवासी व शेजाऱ्यांना काहीही कल्पना नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - ज्वालामुखीच्या शहरात पुन्हा आगडोंब; भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग