ठाणे: बंगल्यात लागलेल्या आगीत बंगला मालकीणचा होरपळून मृत्यू झाला. तर आग विझविण्याचा प्रयत्न करताना कुटुबीयांपैकी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गावात असलेल्या 'आई' या बंगल्यात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात, आगीच्या घटनेसह आकस्मिक मृत्यूची नोंद पोलीसांनी केली असुन तपास सुरु केला आहे. जयश्री भरत म्हात्रे असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या बंगला मालकीणचे नाव आहे.
चिंचपाडा गावात 'आई' नावाचा म्हात्रे कुटूंबाचा बंगला आहे. या बंगल्यात काल मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. त्यावेळी या बंगल्यातील म्हात्रे कुटुंबीय गाढ झोपेत होते. आगीच्या झळा लागताच म्हात्रे कुटुंबीय जागे झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न म्हात्रेचा मुलगा व कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी केला. दरम्यान जयश्री यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर आग विझविणारे बंगल्यातील चारही जण आगीच्या झळांनी होरपळून गंभीर जखमी झाले. तरी देखील आगीच्या ज्वाला, आणि धुरातून वाट काढत बंगल्या बाहेर पडल्याने ते चारही बचावले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत जयश्री यांचे पती भरत म्हात्रे हे या दुर्घटनेच्या वेळी उत्तर भारतात देव दर्शनाला गेल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. बंगल्याला आग लागल्याची घटना कळताच शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून आगीची माहीती दिली. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांनी आग इतरत्र भडकणार नाही, याची खबरदारी घेत आगीवर नियंत्रण मिळवले.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन जवानांनी व्यक्त केली आहे. मात्र या दुघटनेमुळे बंगल्यातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
हेही वाचा : Crime: पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 56 लाखांची फसवणूक; तीन जणांना ठोकल्या बेड्या