कल्याण (ठाणे) - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या 6 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका 20 दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश असल्याचे समोर आले. हा चिमुकला कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याने त्यालाही कोरोनची लागण झाली आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 162वर जाऊन पोहचला आहे.
विशेष म्हणजे गेल्या 15 ते 20 दिवसांत कोरोनाचा फैलाव कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे झपाट्याने वाढला आहे. 162 रुग्णांच्या यादीत मुंबई येथील आरोग्य, पोलीस, बँक या शासकीय सेवेतील सुमारे 50 रुग्णांचा समावेश आहे. तर यांच्या निकट सहवासातील संख्याही 70 ते 80च्या घरात आहे. त्यामुळे बेस्ट बस आणि एसटी कोरोनाचा वाहक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
162 रुग्णांपैकी कल्याण पूर्व येथे 30, कल्याण पश्चिम येथे 21, डोंबिवली पूर्व येथे 57, डोंबिवली पश्चिम येथे 41, मांडा टिटवाळा येथे 6, मोहने येथे 6 तर नांदिवली येथे 1 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील 162 रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरीत 112 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - कामोठेमध्ये अफवा पसरवणाऱ्या दोघांवरुद्ध गुन्हा दाखल