ठाणे : एका बिबट्याच्या बछड्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये अडकल्याचे समोर आले ( Leopards Calf Head Stuck In Jar ) आहे. ही घटना बदलापूर जवळील गोरेगांव भागात घडली असून, कारमधून जाणाऱ्या एका प्रवाशाने त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर गोरेगाव गावातील रहिवाशांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे डोके त्या जारमध्ये अडकून पडले आहे. मात्र, अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने परीसरात भीतीचे वातारण पसरले ( Forest Department Search For Leopards Calf ) आहे.
बिबट्या अवध्या एक वर्षाचा असल्याचा अंदाज..
वन विभागाच्या माहितीनुसार बिबट्याचे हे बछडं असून, अवध्या एक वर्षाचं असल्याचा अंदाज आहे. बदलापूर - कर्जत मार्गावरील गोरेगाव भागात दोन दिवसांपूर्वी ते रात्री पाणी पिण्यासाठी आला असेल. मात्र, यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकल. त्यामुळंही कॅन घेऊन हे बिबट्याचे बछडं फिरत होते. त्यातच कारमधून प्रवास करताना प्रवाशांना बिबट्या अडकलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणं केले. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या बिबट्याचा परवा रात्रीपासून कसून शोध घेतला जात आहे.
परवा रात्रीपासून रात्रीपासून शोध मोहीम..
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याला शोधण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले असले, तरी मात्र बिबट्या आढळून आलेला नाही. परवा रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्यानं ते उपाशी आणि तहानलेले असल्याने त्याचा लवकर शोधण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे.