ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. विशेष म्हणजे कोणार्क विकास आघाडीचे ४ नगरसवेक, रिपाई ऐक्यचे ४, समाजवादीचे २ आणि १ अपक्ष, अशा ११ नगसेवकांची मोट बांधून यंदाच्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी मैदानात उतरली आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता असून कोणार्क आघाडीचा बाजीगर विलास आर.पाटील यांच्या सौदेबाजीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. भाजपही कोणार्क आघाडीच्या दावणीला गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - कांगारूंनी उडवला पाकिस्तानचा धुव्वा, सलग दुसऱ्यांदा मिळवला डावाने विजय
सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडे ४७ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे १२ नगरसवेक आहेत. महापालिकेत काँग्रेस-शिवसेनेच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसच्या २१ नगरसेवकांचा एक गट आणि विरोधी पक्ष गटातील भाजपचे २० नगरसेवक कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख तथा माजी महापौर विलास आर. पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याने सत्ताधारी काँग्रेसचे महापौर जावेद दळवी यांच्या गटामध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आर्थिक प्रलोभनाला बळी पडून कोणार्क आघाडीशी हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेसच्या २१ नगसेवकांना पुन्हा आपल्या तंबूत आणण्यासाठी काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे भाजपचे २० नगरसेवक असूनही त्यांच्याकडून महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न करता काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने कोणार्क आघाडीला साथ दिली आहे. यामुळे काँग्रेस विरुद्ध कोणार्क आघाडी असा सामना रंगणार आहे. सध्या तरी शिवसेनेची काँग्रेसला साथ असल्याने काँग्रेसचे पारडे जड असल्याचे तर्क राजकीय जाणकारांकडून लावला जात आहे.
भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे रिषिका प्रदीप राका, वैशाली मनोज म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील, शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी महापौर पदासाठी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने इम्रान वली मो.खान, राबिया मकबूल हसन, तलाह मोमीन, मुख्तार खान, शिवसेनेचे बाळाराम चौधरी, मदनबुवा नाईक, संजय म्हात्रे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ पीठासीन अधिकारी देणार आहेत. या वेळेपर्यंत जर उमेदवारांमध्ये समझोता झाला नाही तर अनपेक्षित निकाल लागू शकतो.
दरम्यान, महापौरपदासाठी काँग्रेसने रिषिका राका यांनी महापौर जावेद दळवी यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठक घेतली. मात्र, काही काँग्रेस नगरसेवक कोणार्क विकास आघाडीच्या तंबूत असल्याने या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्रदीप राका यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर भाजपच्या २० नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश अथवा सूचना न आल्यामुळे ते देखील काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसह कोणार्क विकास आघाडीच्या कळपात सामील झाले. यामुळे भाजप नगरसेवक कोणार्क विकास आघाडीच्या दावणीला बांधले गेल्याची चर्चा शहरात सुरू असून बहुसंख्य नगरसेवक महाबळेश्वरमधील हॉटेलमध्ये मौज-मजा करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सध्यातरी अस्वस्थ वातावरण पसरले आहे.