ठाणे - एका घरामध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याची घटना घडताच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावातील एका घरात घडली आहे. अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत या भीषण आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे.
अचानक शॉर्टसर्कीटमुळे घराला आग...
भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावात सुरेश गोडे हे कुटूंबासह राहतात. त्यातच बुधवारी (दि. 17) सकाळी साडे दहाच्या सुमारास गोडे यांच्या घरात वीजपुरवठा सुरू असताना अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली होती. आग लागल्याचे पाहताच कुटुंबीयांनी घरातून बाहेर पळ काढला. तर गावकरी आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आग आणखी भडकली व आगीने रौद्ररुप धारण केले.
सुदैवाने कुठलीही जीवितहानी
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या कार्यलयात आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 1 गाडी दाखल होऊन अर्ध्यात तासातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील संसारोपयोगी साहित्याची राख झाली. या घटनेची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हे ही वाचा - धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू