कल्याण (ठाणे) - आपल्या मुलाने रोजच्या प्रमाणे एक दिवस नाश्ता विक्रीची हातगाडी लावली नाही म्हणून नैराश्येपोटी वडिलाने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-मुरबाड मार्गावरील पांजरपोळ गावाच्या हद्दीतील रायते पुलाजवळ घडली आहे. मोहनदास मुरली जमाई (वय 55 वर्षे), असे नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
..यामुळे वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
मृत मोहनदास हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 परिसरातील खेमणी भागातील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होते. तर त्यांचा मुलगा अनिल (वय 31 वर्षे) हा कुटूंबाच्या उदरर्निवाहसाठी तो राहत असलेल्या परिसरात नाश्ता विक्रीची हातगाडी लावतो. मात्र 5 नोव्हेंबरला मुलगा अनिलने नेहमीप्रमाणे नाश्ता विक्रीसाठी हातगाडी लावली नव्हती. त्यामुळे मृत मोहनदास निराश झाले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबरला कल्याण-मुरबाड मार्गावरील कल्याण तालुक्यातील पांजरपोळ गावच्या हद्दीत असलेल्या रायते पुलाखाली सकाळच्या सुमाराला नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
मृतदेहाच्या खिशातील कागद्पत्रावरून पटली ओळख
कल्याण तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोहनदास यांचा मृतदेह नदीपात्रातून काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय पाठवला. त्यांनतर मृतदेहाच्या खिशातील काही कागदपत्रावरून त्यांची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध पोलिसांनी घेतला. त्यानंतर मुलाने नाश्ता विक्रीची हातगाडी लावली नाही, म्हणून मोहनदास यांनी नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा मुलाने कल्याण तालुका पोलिसांनी दिली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हेही वाचा - केडीएमसीत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट; तीन कोविड सेंटर बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय