ठाणे - धनगर प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेत धनगर प्रतिष्ठानातर्फे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी धनगर समाजातील 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. मात्र, यावर्षी हा कार्यक्रम रद्द करून कार्यक्रमाला होणाऱ्या खर्चाची रक्कम कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिष्ठानातर्फे तसेच कार्यकर्ते, समाजबांधव यांनी केलेल्या मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील शाळकरी मुलांना शैक्षणिक किट देण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकाळात जनतेच्या हिताची कामे केली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धनगर प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.