ठाणे - तब्बल दीड कोटी रुपयांचे सोने घेऊन पळून गेलेल्या कारागीरांना पकडण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले आहे. विश्वजीत डे आणि सुजीत डे असे या दोन आरोपींचे नावे आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प-२ मधील सोनार गल्लीत या दोन आरोपींनी आपले सोने घडनावळीचे दुकान सुरू केले होते. ते चांगल्या प्रकारचे कारागीर असल्याचा विश्वास त्यांनी काही काळातच मिळवला. त्यामुळे, मोहन घनशानी, नवीन वलेचा आणि विक्रम लखवानी या तीन सोनारांनी या दोन भावांना ३ किलो ७०० ग्रॅमचे, सुमारे १ कोटी ४२ लाख किमतीचे सोने घडनावळीसाठी दिले होते. मात्र, हे दोघे भाऊ ते सोने घेऊन पसार झाले. सर्वत्र शोध घेऊनही हे कारागीर न सापडल्याने, मोहन यांनी सात दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलिसांमध्ये या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
या दोघांचा शोध घेण्यासाठी उल्हासनगर पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे, पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस शिपाई प्रफुल सानप, गणेश गोपाळ यांचे पथक पश्चिम बंगाल येथे रवाना झाले होते. अथक प्रयत्नानंतर आरोपी विश्वजीत डे आणि सुजीत डे या दोघांना ताब्यात घेऊन उल्हासनगरमध्ये आणण्यात आले. त्यांनी हे सोने कुठे लपवले आहे, याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा : सीसीटीव्हीत चोरी दिसते पण चोर नाही, शिर्डीतील अजब प्रकार...