ठाणे - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला होता. आंदोलनाला पाठिंबा आणि हिंसेला विरोध दर्शवण्यासाठी कल्याण येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली. विद्यार्थ्यांना आंबेडकर उद्यान येथून पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले.
हेही वाचा - दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठीमाराचे आता कल्याण शहरात पडसाद उमटले आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
"पोलिसांनी निर्दोष विद्यार्थ्यांना विद्यापीठात येऊन मारहाण केली, मात्र पोलिसांना कुलगुरूंच्या परवानगीशिवाय विद्यापीठात प्रवेश करता येत नाही." असे प्रतिक्रिया विद्यार्थी भारती राज्य उपाध्यक्ष रत्नदीप आठवले यांनी दिली. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले असून संविधानाच्या अधिकारांचे उल्लंघन करीत असून विद्यार्थ्यांचा आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार हे सरकार हिरावून घेत असल्याचे विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.
दरम्यान, महात्मा फुले चौक पोलिसांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी भारतीच्या राज्यअध्यक्षा मंजिरी धुरी यांच्यासह राहुल घारत, रत्नदीप आठवले, अर्जुन बनसोडे, श्रेया निकाळजे, उदय रसाळ आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका