ठाणे - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरल्याची चिंता व्यक्त सुरू होती. मात्र, दुसरीकडे मतदान सुरक्षीत होण्यासाठी पोलीस व्यस्त होते. तसेच खादीसाठी खाकी वर्दीतल्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - सरकार युतीचेच होणार..! फडणवीसांनी दिले मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रण
ठाणे पोलीस आयुक्तालयात 9 हजार 212 पोलीस असून त्यापैकी 8 हजार 563 पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात जेमतेम 49 टक्के मतदान झाले असतानाही ठाण्यात मात्र खाकी वर्दीतील पोलिसांचे 93 टक्के मतदान झाल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी व्यस्त असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच टपाल मतदानाद्वारे मतदान करून मतदान न करणाऱ्यांसमोर पोलिसांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशा पाचही परिमंडळातील 35 पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व शाखांमध्ये टपाल मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टपाल मतदान कक्षही स्थापन करण्यात आला होता. या कक्षाकडे पाठपुरावा करण्यासाठी मुख्यालयातील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांच्या पातळीवर टपाल मतदान कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. पोलिसांना मतदारयादीतील नाव आणि अनुक्रमांक या माहितीची पडताळणी करून घेण्यासाठी अर्जही पाठवण्यात आले होते.
मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिका मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 12 क्रमांकाचा अर्जही भरून पाठवला होता. टपाल मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर ती भरून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी फारच थोडा वेळ असल्याने पाठपुरावादेखील करण्यात आला. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोलिसांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून दिल्यामुळे बंदोबस्तातही पोलिसांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला. टपाली मतदानाची प्रक्रिया ही किचकट असते. या संदर्भात पोलीस आयुक्तालयात ही प्रक्रिया माहिती होण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे प्रशिक्षणही देण्यात आले.
हेही वाचा - विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला