ठाणे - शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ आणि परिमंडळ ५ मधील ३२३ तक्रारदारांना चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला आहे. शनिवारी ठाण्यात रेझिंग डे कार्याक्रमांचे औचित्य साधून अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्याहस्ते १ कोटी ६३ लाखांचा हा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये २४३.५६ तोळे सोन्याचे दागिने, ६८ वाहने, २२३ मोबाईल, ३५० गोणी कडधान्याचा समावेश आहे.
हेही वाचा - भाजप नगरसेविकेचा पती दिपक सोंडेवर एक कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह सुरू आहे. यानिमित्त शनिवारी ठाणे परिमंडळ १ आणि वागळे इस्टेट परिमंडळ ५ क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत दाखल असलेल्या चोरी, घरफोडी प्रकरणातील जप्त मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये परिमंडळ १ मधील १०९ तक्रारदारांना ७४ लाख ५९ हजार ४८ रूपयांचा मुद्देमाल सुपूर्द केला. यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक आणि इतर गुन्ह्यातील २६ लाख ४२ हजार ८७२ रुपये किंमतीचे १०८.०६ तोळे सोन्याचे दागिने, १२ लाखांच्या ३२ दुचाकी, १२ लाखांच्या चार चारचाकी, ९ लाख ९० हजारांच्या १० रिक्षा, ५ लाख ८३ हजार दोनशे रूपयांचे ४८ मोबाईल, ४५ हजार २५० रूपयांची रोकड आणि ७ लाख ६० हजारांच्या ३५० गोणीतील कडधान्य तसेच इतर किंमतीचा ३७ हजार ७२६ रूपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे.
हेही वाचा - आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन आरोपींना तीन वर्षाचा तुरुंगवास
परिमंडळ ५ वागळे इस्टेटमधील २१४ तक्रारदारांना ८७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल परत केला. यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक आणि इतर गुन्ह्यातील ३७ लाख ३९ हजारांचे १३५.५० तोळे सोन्याचे दागिने, ३१ लाख ५५ हजार रूपये किंमतीची १ बस, ४ चारचाकी, १७ दुचाकी आणि रिक्षा तसेच १७ लाख ६८ हजारांचे १७३ मोबाईल परत केले आहेत.