ठाणे - एकाच कंपनीत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने दुसऱ्या सहकाऱ्याची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी ८ तासाच्या आतच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या मारेकऱ्याच्या उजव्या पायाच्या बोटातील फटीमुळे ओळखून त्याला भोईवाडा पोलिसांनी गजाआड केले.
रामकुमार राजेंद्र सिंग (वय २२) असे गजाआड केलेला मारेकऱ्याचे नाव आहे. तर कृष्णा चीनकन गौतम (वय २५) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. ही हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
भिवंडी शहरातील वसई हायवे नजीक जेव्हीसी कॉम्प्लेक्स ६६गाळा, याठिकाणी मालदे सिंथेटिक कंपनी आहे. या कंपनीत मृत कृष्णा मशीन ऑपरेटर म्हणून काम करून तो इथेच राहत होता. तर मारेकरी राजकुमार हाही याच कंपनीत कामगार म्हणून काम करत होता, पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघा सहकार्यांमध्ये गेले काही महिन्यापासून भांडण होत असे. दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा वाद होता. याच वादातून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला आरोपी राजकुमार याने तोंडाला कपडा बांधून कंपनीत प्रवेश केला, आणि कृष्णाच्या डोक्यात अचानक धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या कंपनीत काम करणारे अमरबहादूर पटेल (वय ४५ ) यांच्या फिर्यादीनुसार भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला कपड्यामधून मध्यरात्री दोन वाजता सुमाराला मारेकरी जाताना दिसत होता. मात्र, तोंड कपड्याने बांधल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. एका सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केल्यावर मारेकरी याच्या पायातील उजव्या बोटाला फट असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी कंपनीत काम करणाऱ्या इतर कामगारांची चौकशी सुरू केली. यामध्ये राजकुमार याच्या पायातील बोटाची फट सीसीटीव्हीत दिसत आहे तशीच असल्याने दिसल्याने त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. आज आरोपी राजकुमार याला न्यायालयात हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे करत आहे.