ठाणे - ठाण्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा हा मंदिराच्या दानपेटीकडे वळला आहे. अश्याच एका साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली ( stole donation box from Saibaba temple ) आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वडघर गावात असलेल्या साई मंदिरात घडली आहे. मात्र, घटनेच्या अवघ्या पाच तासात भिवंडी तालुका पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत वडूनवघर या गावातून आरोपीला दानपेटीसह अटक केली. संतोष पाटील असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पहाटेच्या सुमारास केली चोरी : भिवंडी - खारबाव रस्त्यावरील वडघर गावात साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साईबाबा मंदिर उभारण्यात आले. या ठिकाणी पंचक्रोशीतील बहुसंख्य साईभक्त दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात असलेली लोखंडी स्टीलची दानपेटी आज (२८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे गुरुवार असल्याने दर्शनासाठी सकाळी लवकर आलेल्या भक्तांच्या लक्षात ही बाब आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ भिवंडी तालुका पोलीस ठाण्यास कळवले.
विना नंबरच्या ऍक्टिवा दुचाकीमुळे चोरटा जाळ्यात - माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील, राजेंद्र लाडकर, देवीसिंग परमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील साई भक्तांसोबतच ग्रामस्थांकडे चौकशी केली असता पहाटेच्या सुमारास एक सफेद रंगाची नंबर प्लेट नसलेली ऍक्टिवा दुचाकी मंदिर परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे चौकशी करीत नजीकच्या वडूनवघर या गावातून संतोष पाटील यास संशयाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दानपेटी चोरी केल्याचे कबूल केले.
दानपेटीचा शोध लागला शेतात - या दानपेटीचे कुलूप चोरट्याला उघडता न आल्याने त्याने ती दानपेटी रस्त्याकडेच्या एका शेतात गवतामध्ये फेकून दिली होती. पोलीस आरोपीस त्या ठिकाणी घेऊन जाताच आरोपीने गवतात फेकून दिलेली दानपेटी पोलिसांनी हस्तगत करत संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. या दानपेटीत तीन हजार रुपयांची रक्कम होती.
हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, सुषमा अंधारेंनी घेतले शिवबंधन हाती