ठाणे - सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास संपादन करून शिर्डी व सिद्धिविनायक मंदिरातील जमा होणारी चिल्लर रक्कम सोन्याची बिस्किटे देवून त्या मोबदल्यात कमी रक्कम स्वीकारण्याचा बहाणा करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरंबंद करण्यात पोलिसांना यश आले. शिळ डायघर पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - सातारा पोलीस अधिक्षकांची कारवाई; तिघांना एका वर्षासाठी तडीपार
१३ जुलैला कल्याणफाट्याजवळ हॉटेल शालू येथे लेदरचा व्यवसाय करणारे निशाद अहमद शेख (४२) यांना कमल व चेतन या फसवणूक करणाऱ्या दोघांनी बोलावून योग्य दरात लेदर देतो असे सांगितले. दोघांनी निशाद यांच्याकडून २ लाख रुपये घेतले व गोडावून दाखवण्याच्या बहाण्याने पळ काढला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तपासात आरोपी हे मोबाईल तंत्रज्ञानाने अद्यावत असल्याचे तसेच वेळोवेळी सिमकार्ड व मोबाईल बदलत होते. त्यामुळे त्यांना पकडणे आव्हानात्मक व जिकरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाचे आधारे आरोपींचे मोबाईल नंबर हस्तगत केले. आरोपी भीमराज मलिका, अर्जून मालजी उर्फ चेतन, मांजिद उर्फ केतन उर्फ सोनुसिंग (वय-३१, रा.गोवंडी), प्रविण सुखसागर वर्मा उर्फ कमल उर्फ लल्लू (वय-२९, रा.मुंब्रा), मल्लेश श्रीमंत डिंगी उर्फ मल्लू (वय-४७, रा.भिवंडी), चवड्डा नरसिंग किलोर (वय-३८, रा.भिवंडी) यांना मोठ्या कौशल्याने अटक केली आहे.
आरोपीकडून एकूण १० मोबाईल फोन फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी २८ हजार, नकली नोटा व नकली सोन्याची बिस्किटे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध नवी मुंबईतील तुर्भे खारघर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तसेच अन्य पोलीस ठाण्यात ७ ते ८ गुन्हे केल्याचे उघडकीस झाले आहे या आरोपींनी सार्वसामान्य लोकांची सुमारे १ कोटी फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - अकाेल्यात निवडणूक आयोगाच्या पथकाकडून साडेपाच लाखांची रोकड जप्त