ठाणे - जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी व गर्भवती महिलांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पूरक व पोषक आहाराचा काळाबाजार करणारी अंगणवाडीची पर्यवेक्षिका पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. या आरोपी महिलेकडून 59 हजार 813 रुपयांची पोषक आहारातील अन्नधान्यांचे बंद पाकिटे व इतर उपयोगी वस्तू जप्त करून टेम्पो पण ताब्यात घेण्यात आला. सुषमा घुगे असे आहाराचा काळाबाजार करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे नाव आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागातील अंगणवाडीमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना व गर्भवती महिलांना शासनाकडून पूरक व पोषक आहार दिला जातो. मात्र, शासनाच्या या योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागल्याची घटना डोंबिवली पूर्व अंतर्गत येणाऱ्या निळजे सेक्टरमधील अंगणवाडीत घडली. गेल्या काही दिवसापासून निळजे सेक्टरमध्ये असलेल्या अंगणवाडीमधील लहान मुलांना व गर्भवती महिलांना शासनाकडून पुरवण्यात येणारे पूरक व पोषक आहार योजनेतील जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात अनियमितता होत असल्या बाबत गोपनीय माहिती जिल्हा परिषद ठाणे येथील अधिकारी संतोष भोसले आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दुपारच्या सुमारास मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना वस्तुस्थिती समजून सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मानपाडा पोलिसांनी सापळा रचून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो रंगेहाथ पकडला आहे. या टेम्पोमध्ये तेल, गहू ,तांदूळ ,हळद, मसाला ,साखर, आधीअन्नधान्याची पाकिटे आणि इतर आवश्यक असलेल्या वस्तू आढळून आल्या.
टेम्पोत आढळून आलेले अन्नधान्य आणि इतर साहित्याची एकूण किमत 59 हजार 813 रुपये इतकी असून सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी काळाबाजार करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सुषमा घुगेला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेऊन तिच्यावर भादंवि कलम 420 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.