ठाणे : तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या 'ठाणे' शहरातील मरणपंथाला लागलेल्या विहीरींचे पुनरुज्जीवन करण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या ५० कोटी निधीतून ठाण्यातील तब्बल ६७ विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करून पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेवरील ताण कमी होऊन शटडाऊन काळात ठाणेकरांना विहीरीच्या पाण्याचा आधार मिळणार आहे. विहिरींसाठी थेट ५० कोटी रुपये ठाण्याला मिळाल्याने विहिरीना पुनर्जन्म होणार आहे.
फार वर्षापासून ते ब्रिटिश कारकिर्दित ठाणे शहर तलावांचे शहर गणले जात असे. असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात ३५० सार्वजनिक आणि २०५ खासगी अशा एकूण ५५५ विहिरी आहेत. शहरातील जुन्या वस्त्या, गावठाणे, पाडे आणि कोळीवाड्यांची तहान भागवण्याचे काम विहिरी करीत होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींची संख्या नोंदवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये यापैकी अनेक विहिरी शहरीकरण आणि विकासाच्या कामात बळी पडल्या. अतिक्रमण करून कॉंक्रीट टाकून काही विहिरी बुजवण्यात आल्या असल्याचे वास्तव आहे. नळाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर विहिरींच्या पाण्याचा वापर बंद झाल्याने अस्तित्वातील विहिरींची संख्या कमी झाली. तर दुसरीकडे शहरात अस्तित्व टिकवून असलेल्या विहिरींना प्रदूषणाचा विळखा पडला आहे.
महापालिकेच्या मलनि:स्सारण वाहिन्या, सांडपाणी, गटारे आणि नाले यांचे नियोजन करताना आजूबाजूंच्या विहिरींचा निचरा होत नसल्यामुळे अनेक विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळेच अशा विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यानुसार, नगरविकास विभागाच्या ५० कोटीच्या निधीतून ६७ विहिरींची शास्त्रोक्त पध्दतीने साफसफाई करुन नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठी आरओ प्रकल्पाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
सल्लागाराची नियुक्ती - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विहिरींची शास्त्रोक्त पध्दतीने साफसफाई करुन नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठी सल्लागाराची नेमणुक करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये येत असलेल्या सर्व विहिरींच्या कामाचा खर्च 50 कोटी असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क अंदाजे १ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांचा पुढाकार - प्रामुख्याने ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा-माजिवडा परीसरातील ६७ विहिरींचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, मुलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेंतर्गत ५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार,लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.