ठाणे - महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी, 'हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा' असे आव्हान मराठ्यांना दिले होते. आम्ही हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र, त्यानिमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणार्यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली, अशा शब्दात ठाणे सकल मराठा समाजाचे नेते कैलाश म्हापदी यांनी सभागृह नेत्यांवर पलटवार केला आहे.
शिवशिल्पाच्या दुरुस्तीमध्ये महापालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांना मंगळवारी नरेश म्हस्के यांनी 'चिल्लर' असे संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर या पदाधिकार्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करून घेतला. यासंदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी बोलत होते.
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर येणार्या या लोकांना आपल्या नजरेसमोर पडझड झालेले शिवशिल्प दिसत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाकडून काम करून घेणे हे सत्ताधार्यांचे कर्तव्य असते. मात्र, ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संवैधानिक मार्गाने आंदोलन करणार्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हापदी म्हणाले.
सर्वात गंभीर म्हणजे महापौरांना भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गेलेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणे सभागृह नेत्याला शोभणारे नाही. आम्ही शिवशिल्पाच्या दुरुस्तीची मागणी करायला गेलो होतो. मात्र, त्यांनी ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा केली. यावरून या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे? हे दिसून येत असल्याचे म्हापदी म्हणाले.
मते मागण्यासाठी मराठा समाजाच्या दारात भिकार्यासारखे येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारीक वारसांना ‘चिल्लर’ असे म्हणत असतील तर त्याचा हिशोब आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुकता केला जाईल. मात्र, महाराष्ट्राच्या दैवताच्या चित्रशिल्पाचा अवमान होत असताना उघड्या डोळ्याने ते पाहणार्या महापालिकेतील सत्ताधार्यांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही, असेही म्हापदी म्हणाले. यावेळी रमेश आंबरे, अॅड. संतोष सूर्यराव, दत्ता चव्हाण, अविनाश पवार आदी उपस्थित होते.