ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निवीष्ठांबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, त्यांची जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशा सूचना नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा कृषी अधिकारी माने यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, नागली, तृण धान्य, कडधान्य, गळीत धान्य क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ११ हजार ५०० क्विंटल बियाणांची गरज आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते आणि इतर कृषि निविष्ठा उपलब्ध करून देव्यात. याबाबत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
खते मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्यांचे नियोजन या विषयांवर यावेळी चर्चा झाली. जिल्हा खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाबरोबर पतपुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेवर करा. आत्तापर्यंत ५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले आहे. उर्वरित वाटप लवकर करावे अशा सूचनाही पालकमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.