ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागात पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर शरद पवारांसोबत एकनाथ शिंदेंच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा - मनसेच्या वादग्रस्त फलकावरून राजकारण तापले; मराठी-गुजराती वाद चिघळण्याची शक्यता
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांच्या प्रभागातील लोकमान्य नगर भागात पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला पालकमंत्री शिंदेंनी उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या उद्घाटनाच्या वेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवर एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे असे चित्र दिसत होते. एकनाथ शिंदे यांनी या परिसरामध्ये लवकरच क्लस्टर डेव्हलपमेंट नंतर करणार असल्याचे सांगून या प्रभागातील नागरिकांची मने जिंकली. यावरुन ठाण्यातल्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संधी मिळाल्यास विधानसभेला संधीचे सोने करू असे म्हटले आहे.
हे ही वाचा - बदलापुरात राष्ट्रवादीकडून आश्वासनांचे फुगे सोडून युती सरकारचा निषेध
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांमध्ये पक्षांतराला जोर चढला असून यातून ठाणे सुध्दा सुटलेले नाही. काही महिन्यांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्या प्रभागातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपस्थित राहिल्याने पक्षांतराच्या चर्चांना उधाण आहं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना न बोलावता शिवसेनेच्या नेत्यांकडून केलेले उद्घाटन चर्चेचा विषय ठरला आहे.
हे ही वाचा - ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंडाकडून धमकीचा फोन