ठाणे : Death Threat to Builder : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत सहभागी, तसेच अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं डोंबिवलीतील एका बिल्डरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. आकाश गिरी (वय २३ वर्षे) आणि इंद्रजित यादव (वय ३० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
काय धमकी दिली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिमाया इंटरप्रायजेस, बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक प्रशांत जाधव यांना १३ ऑक्टोबर रोजी फोनकॉल आणि व्हॉट्सअॅप व्दारे धमकी देण्यात आली होती. आरोपी आकाश गिरी यानं प्रशांत जाधव यांना, इंद्रजित यादव याचे पैसे दिले नाही तर तुझा मर्डर करतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर जाधव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या धमकीमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचं हात असल्याच्या संशयानं पोलिसांनी याचा गांभीर्यानं तपास सुरू केला.
दोन्ही आरोपींना अटक : पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे आणि त्याचं पथक या कामी लागलं. त्यांनी ज्या मोबाईल नंबरवरून धमकी मिळाली होती, त्या आधारे आरोपीचा छडा लावला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींची अधिक चौकशी केली असता, आकाश गिरी हा तक्रारदार जाधव यांच्याकडे यापूर्वी कामाला होता हे उघडकीस आलं. या दोघांनी दारूच्या नशेत जाधव यांच्याकडे पैशांची मागणी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी (१५ ऑक्टोबर) दोघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा :