ठाणे - खाडीतून काढलेली अवैध रेती आणि खडीची रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एकूण १० जणांच्या टोळीला अटक करण्यात यश आले असून त्यांच्याकडून १ कोटी २८ लाख रुपयांचा गौण खनिज परवाना पावत्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बनावट रॉयल्टीच्या पावत्या छापून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी शिताफीने या १० जणांना अटक केली. विकी माळी, अब्दुल खान, पद्माकर राणे, शाजी पुनान, अरविंद पेवेकर, प्रशांत म्हात्रे, लकी सुतार, उमेश यादव, राजू पवार आणि रवी जैस्वाल अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५६ पावती पुस्तके, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव जप्त करण्यात आले असून हे टोळके कळवा आणि भिवंडी भागात राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भिवंडी-वसई खाडीजवळ आपले सावज हेरून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीची व्याप्ती केवढी होती आणि हे स्कॅम एकंदरीत केवढे मोठे आहे, याचा तपास पोलीस करत असून लवकरच सत्य बाहेर येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.