मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात संपूर्ण देशभर वातावरण तापवत आहेत. यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जींचीही भेट घेतली होती. यानंतर आता कोहिनूर मीलप्रकरणी राज यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. याचे पडसाद मुंबई, ठाण्यात उमटायला सुरुवात झाले आहे.
ठाणे जिल्हा मनसेने ठाणे बंदचा इशारा दिला होता. मात्र राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाण्यातील मनसेचा बंद मागे घेण्यात आला. तसेच राज यांना ईडीने दिलेल्या नोटीसच्या प्रतिंची होळी करून निषेध करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली होती. राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाणे मनसैनिकांनी ठाणे बंद मागे घेत आंदोलन रद्द केले आहे.