ठाणे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग या सर्व यंत्रणा रस्त्यावरती उतरल्या आहेत. मात्र, शहरातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे.
हेही वाचा - मिरा भाईंदर : उद्या स्थायी समिती सभापती निवडणूक; भाजप विरुद्ध भाजप वाद रंगण्याची शक्यता
मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात कोरोणाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. तीन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला संबोधताना, 'होय मी जबाबदार', ही मोहीम त्यांनी सुरू केली. महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, मात्र नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. एवढेच नव्हे तर, त्यांनी राज्यातील जनतेला आठ दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अल्टिमेटमला तीन दिवस उलटून गेले, तरी ठाणे, मुंबईतील काही बेजबाबदार नागरिक अजूनही शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाही.
बाजार, हॉटेलमध्ये नियमांची पायमल्ली
आजही बाजार, हॉटेल, ट्रेन, तसेच खासगी कार्यालय आणि शासकीय अस्थापनांमध्येसुद्धा नियमांची पायमल्ली जोरात सुरू आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंबर कसली आहे. ठाणे शहरात दोन दिवसांपूर्वींच ५ बारवर कारवाई करून ते सील करण्यात आले. स्वतः ठाणे महापालिका आयुक्त डॉ. नितीन शर्मा हे दौरे करून धोरणाचा आढावा घेत आहेत. तसेच, महापालिकेच्या यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज करण्यात आल्या आहेत.
बाजारात पोलिसांची पेट्रोलिंग
जिल्हा प्रशासनसुद्धा सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांना कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानंतर पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज झाले असून, बाजारात पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. जे फेरीवाले, दुकानदार, तसेच ग्राहक मास्क लावत नाहीत त्यांना पोलीस प्रशासन वारंवार सूचना देत आहेत.
तसेच, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाई तीव्र करा, असे निर्देश दिले आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहे. मात्र, काही बेजबाबदार नागरिकांचे वर्तन अजूनही सुधरले नसल्याची बाब रियालिटी चेकमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आता लग्नसराईची दिवसे सुरू असताना पोलीस, तसेच महापालिकेतर्फे 50 पेक्षा जास्त लोक हॉलमध्ये जमल्यास कारवाई करण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
हेही वाचा - ठाणे : हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तिघा तरुणांवर गुन्हा दाखल