ठाणे - शहरातील वर्तकनगर येथील लिटल फ्लॉवर चर्चच्या बाजूच्या सेंट बाप्टिस्ट ट्रस्टच्या 'आर' झोनमधील मोकळ्या जागेतील दफनविधीवरून उद्भवलेला वाद आणखीनच चिघळला आहे. यासंदर्भात सोमवारी थेट पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात सुनावणी झाली. पालिका आयुक्तांनी दफनभूमीच्या बाजूने असणाऱ्या आणि याला विरोध करणाऱ्या दोघांचीही बाजू ऐकून घेतली. याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल होऊनही पुन्हा शनिवारी क्रूस रोवण्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने, हा वाद उफाळून आला आहे.
ठाण्यातील वर्तकनगरातील मोकळ्या जागेवर दफनविधी झाल्याचा प्रकार नुकताच घडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दफनविधी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ११ जणांना अटक झाली होती. तसेच त्यानंतर जामिनावर सुटकाही झाली होती. दफनविधीसाठी जागा नसल्याने हा प्रकार केल्याचा दावा दफन करणाऱ्यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयामध्ये जितेंद्र इंदिसे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास ६ आठवड्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. गेल्या ३० एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यानंतर या भागातील मोकळ्या मैदानामध्ये शनिवारी क्रूस रोवण्याचा प्रकार येथील रहिवाशांच्या लक्षात आला. त्यामुळे येथील सुमारे १०० ते १५० नागरिक वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना या धार्मिक कार्यक्रमाची माहिती देऊन हा प्रकार तात्काळ थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दफनविधी होत नसल्याचा दावाही येथील उपस्थित मंडळींनी केला. त्यानुसार पोलिसांनी त्यांना या भागात कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा भंग होईल, असे कृत्य करू नये, अशी सूचना दिली. तसेच या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आश्वासनही येथील गृहसंकुलातील नागरिकांना देण्यात आले आहे.
शनिवारी यासंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात बराच वेळ सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. यामध्ये मात्र मूळ मालक सेंट बाप्टिस्ट ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. मात्र, न्यायालयात याचिका दाखल असताना, अशा मंडळींकडून अनधिकृतपणे दफनभूमी निर्माण केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी केला आहे. तर स्थानिक नगरसेविका राधिका फाटक यांनी देखील या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये दफनभूमी होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या सुनावणीसाठी आजूबाजूच्या सोसायट्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. आयुक्तांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले असून यासंदर्भात आमचे म्हणणे आयुक्तांनी ऐकून घेतले आहे. याशिवाय या जागेचे मूळ मालक सेंट बाप्टिस्ट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनादेखील बोलवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. न्यायालयाचे निर्णय असताना देखील या जागेत क्रूस गाडण्याचे काम सुरू असून यामुळे जातीय तेढ निर्माण करण्यात येत असल्याचे इंदिसे म्हणाले. त्यामुळे दफनभूमीला प्रचंड विरोध होत आहे.
प्रभाग क्रमांकी ७ मध्ये हा सर्व प्रकार सुरू आहे. अनधिकृतपणे रहिवासी भागात अशा प्रकारे प्रेत दफन केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये या पट्ट्यात राहणाऱ्या गृहसंकुलातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या बाजूने उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. मी यापूर्वीच या जागेत क्लब हाऊस आणि क्रीडांगणाचा प्रस्ताव दिला असून हा प्रस्ताव मंजूरदेखील झाला असल्याचे नगरसेविका राधिका फाटक म्हणाल्या. पालिकेचे क्रीडांगणाचे आरक्षण असतानादेखील महापालिकेने ही जागा ताब्यात का घेतली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.