ठाणे : विसरून गेलेले, चोरीस गेलेले किंवा गहाळ झालेले महागडे मोबाईल परत मिळण्याची शक्यता खुपच धूसर असते. या संदर्भात तक्रार करायला गेल्यास हरवला की चोरी गेला. तुमचे लक्ष नव्हते का अशा पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. मात्र ठाणे खंडणी विरोधी पथकाने सीईआयआर या प्रणालीच्या माध्यमातून तब्बल ३२ मोबाईल शोधून काढत ते तक्रारदारांना परत दिले आहेत. या मोबाईलची किंमत ६ लाख ५१ हजार एवढी असलायची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीं च्या आधारावर पोलिसांनी तक्रारदारां कडून आवश्यक माहिती घेऊन मोबाईलचा शोध घेण्यासाठी अद्यावत आधुनिक कार्यप्रणाली सीईआयआरचा उपयोग केला त्यांना हरवलेल्या तब्बल ३२ महागड्या मोबाईलचा शोध घेण्यात यश लाभले.
या मोबाईल शोध पथकात पोलीस हवालदार संदीप भोसले, पोलीस शिपाई देवेंद्र देवरे,तानाजी पाटील, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले आदींनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून तब्बल ६ लाख ५१ हजार रुपये किमतीचे ३२ मोबाईल हस्तगत केले. खंडणी विरोधी पथकाचे वपोनि मालोजी शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी १ ऑगस्ट, २०२३ रोजी तक्रारदारांची शहानिशा करीत त्यांना ते परत करण्यात आले. यामुळे तक्रारदारांनी पोलीस पथकाचे आभार मानले आहेत.
मोबाईल गहाळ होणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. सर्वसाधारणपणे सर्वच नागरिकांच्या बाबतीत मोबाईल गहाळ होणे किंवा चोरीला जाणे हे प्रकार होत असतात. मात्र हे प्रकार होऊ नये यासाठी स्वतः सजग राहून आपल्या मोबाईलची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोबाईल मध्ये असलेला आपला डाटा देखील सुरक्षित ठेवण्यात इतकच महत्त्वाचा आहे. कारण बँक आणि बँकिंग संदर्भातील सर्व बाबी या मोबाईल मध्ये सेव असल्यामुळे हा एक मोठा धोका सर्वसामान्यांच्या खिशाला होवू शकतो. असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.