ठाणे - ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी दोघांना ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायधीश आर. एच. झा यांनी 10 महिने 3 दिवसांची शिक्षा सोमवारी (दि. 3 फेब्रुवारी) सुनावली आहे. जावेद अब्दुल जलील खान (वय 31 वर्षे) आणि अब्दुल करीम मेहबूब शेख (वय 30 वर्षे), असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
31 मार्च, 2019 रोजी तक्रारदार ट्रक चालक शिवराज जगदंबा सिंग (वय 39 वर्षे, रा. दीघरी, ता. हंडिया, जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) हा महाडवरून माल घेऊन तारापूरच्या दिशेने मुंब्रा बायपासवरून रेतीबंदर या घटनास्थळी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोहचला. त्याचवेळी त्यांचा ट्रक पंक्चर झाला म्हणून ते रस्त्याच्या बाजूला ट्रक लावून बसला होता. त्यावेळी घटनास्थळी आरोपी जावेद अब्दुल जलील खान(वय 31 वर्षे, रा. शरीफा महल बिल्डिंग नं. 102 पहिला माळा अमृतनगर, मुंब्रा) आणि अब्दुल करीम मेहबूब शेख (वय 31 वर्षे, रा. आशियाना बिल्डिंग रुम नं 102, पहिला माळा दत्तूवाडी, मुंब्रा) हे रिक्षातून आले. त्यांनी ट्रक चालकाला धमकावून त्यांच्याकडील 2 हजार 250 रुपयांची लूट केली आणि पोबारा केला होता.
हेही वाचा - भिवंडीच्या धाडसी दरोड्याची 72 तासात उकल, म्होरक्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. बोरसे यांनी लुटीप्रकरणी दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात नेले. त्यावेळी न्यायालयाने 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हे प्रकरण ठाणे प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. झा यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. सरकारी वकिलांनी 2 पोलीस कर्मचारी आणि 1 साक्षीदार असे 3 साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर पोलिसांनी लावलेल्या तपासाचा अहवाल, साक्षीदार आणि इतर सबळ पुरावे ग्राह्य धरून दोघा आरोपींना 10 महिने आणि 3 दिवसाची शिक्षेचा निकाल सोमवारी दिला.
हेही वाचा - कल्याणचे आंदोलन मागे; तर भिवंडीत 'शाहीनबाग' सुरूच