ठाणे - एका अल्पवयीन विद्यार्थाचा धक्का लागल्याने दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या हातातील बर्फाचा गोळा हातातून पडला. याचा जाब विचारला असता, ज्याचा धक्का लागला त्या अल्पवयीन विद्यार्थ्याने संबंधित विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील काळा तलावच्या गेट समोर उभ्या असलेल्या बर्फाचा गोळा तयार करणाऱ्या हातगाडीवर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये राहणारा 16 वर्षीय विद्यार्थी दुपारी एक वाजल्याचा सुमारास काळा तलावच्या गेट समोर बर्फाचा गोळा खात होता. यावेळी त्याला या ठिकाणाहून जाणाऱ्या एक अल्पवयीन मुलाचा धक्का लागल्याने त्याचा गोळा हातातून पडला. त्यामुळे विद्यार्थ्याने त्या अल्पवयीन मुलाला बर्फाचा गोळा का पडला याचा जाब विचारला. मात्र, जाब विचारल्याने संतापलेल्या त्या अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला जखमी केले.
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - समाजकंटकाने पेटवले फिरते शौचालय; कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ११ लाखांचे नुकसान