जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांच्या परिस्थितीची भारतातील अल्पसंख्याकांशी तुलना केली आहे. त्यामुळं आता राजकीय वर्तुळात एका नवीन वादाला तोंड फुटलंय.
मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या अनेक नेत्यांनी निषेध केलाय. तसंच जम्मू-काश्मीर सरकारकडं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीदेखील करण्यात आलीय. शिवाय मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याला भाजपाकडून 'देशविरोधी' ठरवण्यात आलंय.
भाजपाची टीका : बांगलादेशमधील परिस्थितीची भारताशी तुलना करून 'देशविरोधी' वक्तव्य केल्याचा आरोप जम्मू-काश्मीरमधील भाजपा नेत्यानं केलाय. जम्मू आणि काश्मीर भाजपाचे माजी अध्यक्ष रविंदर रैना यांनी मुफ्ती यांच्या विधानाला चुकीचं आणि निषेधार्ह म्हटलंय. तसंच बांगलादेश हा अल्पसंख्याकांवर हल्ले, महिलांचा छळ यासह गंभीर मानवी हक्क उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यामुळं त्याची आणि भारताची तुलना होऊ शकत नाही. जम्मू आणि काश्मीर सरकारनं मेहबुबा यांच्या देशविरोधी वक्तव्याची गंभीर दखल घ्यायला हवी. तसंच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बांगलादेश आणि भारतातील परिस्थितीची तुलना नाही : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुफ्ती यांनी अशी विधानं केल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी केलाय. ते म्हणाले, "पीडीपी पूर्णपणे संपुष्टात आली. मेहबुबा मुफ्ती या आपला पक्ष पुन्हा स्थापन करण्याच्या प्रयत्नात मुस्लिमांना चिथावणी देण्यासाठी अशी विधानं करत आहेत. देशात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये अधिक मुस्लिम आहेत, हे पूर्णपणे जाणून त्या अशा प्रकारची विधानं करतात. त्यातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत."
नेमकं काय म्हणाल्या होत्या मेहबुबा मुफ्ती? : "बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तसेच भारतातही अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असतील, तर भारत आणि बांगलादेशमध्ये फरक काय? मला भारत आणि बांगलादेश यांच्यात काहीच फरक दिसत नाही", असं मेहबुबा मुफ्ती रविवारी (1 डिसेंबर) म्हणाल्या होत्या.