बंगळुरू : परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी पदभार स्वीकारण्यास जाताना झालेल्या अपघातात ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना हसन शहराजवळील कित्तानेगडी गावात घडली. हर्षवर्धन असं अपघातात ठार झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव असून ते हसन इथं पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार घेण्यासाठी जात होते. यावेळी होलेनरासीपुरा शहरातून हसन शहराकडे जाताना जिल्हा सशस्त्र राखीव चौकात गाडीचा टायर फुटून हा अपघात झाला.
आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू : हसन जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार घेण्यासाठी हर्षवर्धन हे परिविक्षाधीन आयपीएस अधीकारी जात होते. यावेळी पोलीस कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या कारचा चालक मंजे गौडा हा देखील गंभीर जखमी झाला. अपघात घडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कोण होते आयपीएस हर्षवर्धन : हर्षवर्धन हे मूळचे मध्यप्रदेशातील रिवा इथले रहिवासी होते. हर्षवर्धन यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवेत दाखल होण्याचं स्वप्न उरी बाळगलं. इतकचं नव्हे, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून त्यांनी 2022-23 मध्ये कर्नाटक राज्याचं केडर मिळवलं होतं. त्यामुळे मैसूर इथं कर्नाटक पोलीस अकादमीत आयपीएसचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन ते आपली सेवा बजावण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर त्यांनी मध्य परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बोरालिंगय्या यांची भेट घेऊन आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी हसन इथं जात होते. मात्र प्रवासात त्यांच्या पोलीस वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हसनचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीथा आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटेश नायडू यांनी हॉस्पिटलला भेट दिली. पोलीस महानिरीक्षक बोरलिंगय्या यांनीही हर्षवर्धन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा :