नवी मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातारा वडूज येथून येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अपघात झाला. अज्ञात ट्रेलरने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, संबंधित चालक ट्रेलर घेऊन फरार झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून 13 जण जखमी आहेत. त्यांना उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
वडूज येथून मुंबईच्या दिशेने येत होती बस-
एमएच 14 बीटी 4697 या क्रमांकाची रातराणी एसटी बस वडूज येथून मुंबईच्या दिशेने येत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पनवेल जवळील कोन गावच्या हद्दीत या बसला अज्ञात ट्रेलरने धडक दिली. त्यामुळे एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बसमधील 13 प्रवासी जखमी झाले असून सातारा येथे राहणाऱ्या 36 वर्षीय प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गणेश कदम असे मृत्यू प्रवाशाचे नाव आहे.
ट्रेलर चालक फरार-
या अपघातानंतर ट्रेलर चालक ट्रेलर घेऊन फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, पनवेल तालुका पोलीस तसेच रस्ते विकास महामंडळाचे शिघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना कामोठे एमजीएम रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- निवार चक्रीवादळाची तीव्रता कमी, पूर्णपणे नष्ट होण्यास लागणार १२ तास; पाहा LIVE अपडेट्स..