ठाणे : नोकरी व पैशाचे आमिष देऊन एका तोतया विद्यार्थीला दहावीच्या परीक्षेत बसविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिक्षक संभाजी सावंत (५१) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तोतया विद्यार्थीला अटक केली आहे. सागर कटला (वय,२१ रा. पद्मानगर, भिवंडी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
४ मार्चपासून इंग्रजी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. या परीक्षेत मूळ विद्यार्थी जगन्नाथ मुल्या हा स्वतः परीक्षा न देता त्याचा मित्र चरण देवसानी या दोघां मित्राने आरोपी सागर याला गाठले. त्यांनतर त्याला पैशाचे व बंगळुरू येथे नोकरीचे आमिष दाखून जगन्नाथ याच्या नावाने परीक्षा देण्यासाठी सांगितले. त्यानुसार आरोपी सागर याने ४ मार्च रोजी डमी बसून जगन्नाथचा मराठीचा पेपर सोडवला होता. त्या मोबदल्यात त्याला ५०० रुपये देण्यात आले. तर आज झालेल्या हिंदी पेपर देण्यासाठीही डमी म्हणून बसविण्यात आले. मात्र पोद्दार स्कूलचे शिक्षक संभाजी सावंत यांना आरोपी सागरचा संशय आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा खळबळजनक प्रकार समोर आला.
दरम्यान मूळ विद्यार्थी जगन्नाथ व त्याचा मित्र चरण याने आरोपी सागरला मराठी व हिंदी विषयात पास झाल्यावर त्याला बंगळुरू येथे नोकरीचे आमिष दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी मूळ विद्यार्थी जगन्नाथ, त्याचा मित्र चरण आणि तोतया सागर या त्रिकुटाविरोधात भादंवि कलम ४१६, ४१९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तोतया सागर याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. यु. कारवार करीत आहेत.