ठाणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरणासाठी सर्वत्र फवारणी केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 27 गावांमध्ये अशी फवारणी करणार होती. मात्र, तयार आराखड्यातील वेळापत्रकाप्रमाणे गाव-खेड्यांमध्ये फवारणी झाली नाही. त्यामुळे या गावात आरोग्य सेवेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे याच ग्रामस्थांनी निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड ऐवजी डास, अळ्या मारण्यासाठीच्या औषधाची फवारणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणला आहे. गाव-खेड्यात राहणारे दुधखुळे आहेत का?, असा सवाल करत ग्रामस्थांनी केडीएमसीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा- लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरांसह गाव-खेड्यांमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु, या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी महानगरपालिकाच करू शकते. त्यामुळे 27 गावांतील ग्रामस्थ जंतुनाशक फवारणीच्या वेळापत्रकाप्रमाणे वाट पाहत होते. मात्र, त्याप्रमाणे काम झाले नाही.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लढण्यासाठी महापालिका यावेळीही अपयशी ठरली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून 27 गावांसाठी जंतुनाशक फवारणीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, वेळापत्रकानूसार फवारणी न होता तीन दिवस उशिराने सुरू झाली. तसेच या जंतूनाशक फवारणीसाठी फवारणीयंत्रात सोडिअम हायपोक्लोराईड वापरण्याऐवजी शेत किंवा बाग-बगिच्यांमध्ये फवारणीसाठी वापरण्यात येत असलेले मच्छर, अळ्या मारण्याचे औषध टाकले जात आहे.
डोंबिवली शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ठोस उपाय योजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेला साधन सामुग्रींची कमतरता भासत असेल तर त्यासाठी राज्य शासनाची मदत घ्यावी, अशीही मागणी सर्व पक्षीय युवा मोर्चाचे मुख्य संघटक गजानन पाटील यांनी केली आहे.