ठाणे - एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यातच डोंबिवली शहरात रुग्णांची संख्या आतापर्यंत ३७ वर पोहचली आहे. दुसरीकडे डोंबिवलीतील मिलापनगर येथील वंदेमातरम उद्यानलगत काही झाडांवर काळ्या बाहुल्या, लिंबू आणि त्यावर टाचणीने टोचून घडी केलेला कागद असे दृश्य रहिवाशांना पाहण्यास मिळाल्याने रहिवाशांनी मानपाडा पोलिसांकडे धाव घेतली आहे.
डोंबिवली शहर सुशिक्षित, सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. याच डोंबिवली शहरात लॉकडाऊनच्या काळात असे जादूटोण्याचे प्रकार घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यापूर्वीही याच परिसरात असे जादूटोण्याचे प्रकार घडले आहेत. आता तर झाडांवर काळी बाहुली टांगून त्यांवर लिंबू व घडी केलेला कागद टोचून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर मधून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दोन ठिकाणी काही अंतराने झाडांवर अशी दृश्य गेल्या दोन दिवसांपासून रहिवाशांना दिसून येत आहेत.
असे अंधश्रद्धेचे प्रकार या परिसरात यापूर्वीही अनेकदा घडल्याची माहिती राजू नलावडे यांनी दिली असून त्यांच्यासह काही रहिवाशांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत नमूद केले कि, असे अघोरी कृत्य करणाऱ्याचा तपास करून त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केल्याची माहितीही राजू नलावडे यांनी दिली आहे.