ठाणे - बिस्लरीच्या गोदामातील एका बॉक्समध्ये सात फुटाचा साप आढळला. ही घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी जेल रोडवरील डॉन बास्को स्कूलशेजारी असलेल्या बिस्लरीच्या गोदामात घडली. यानंतर सर्पमित्राला बोलावून या सापाला पकडण्यात आले.
हेही वाचा - नाशिकच्या व्यापाऱ्याला 14 लाखांचा गंडा घालणारा बंटी अटक तर बबली फरार
भक्ष्याच्या शोधात विषारी - बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून अनेक साप पकडून जंगलात सोडल्याचे समोर आले. त्यातच पुन्हा कल्याण पश्चिमेकडील डॉन बास्को स्कूलशेजारी असलेल्या बिस्लरीच्या गोदामात सात फुटाचा साप भक्ष्य शोधण्यासाठी शिरला होता. यावेळी एका कामगाराने त्या सापाला एका बॉक्समध्ये घुसताना पाहिल्याने त्याने इतर कामगारांना गोदामात साप शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्वच कामगारांनी गोदामाबाहेर पळ काढला.
त्यानंतर गोदामाच्या सुरक्षारक्षकाने वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून यासंदर्भातली माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे घटनास्थळी जाऊन त्यांनी त्या सापाला बॉक्समधून शिताफीने बाहेर काढले, आणि पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून सर्वच कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.
हा साप धामण जातीचा असून या सापाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.