ठाणे - एका स्वयंपाक घरात भलामोठा साप पाहून कुटुंबाने घराबाहेर धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील कोळीवाली गावातील एका स्वयंपाकघरात घडली आहे.
कल्याण पश्चिमेला कोळीवाली, वाडेघर, सापर्डे, उंबर्डे, गावाच्या परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यामुळे बिळातून विषारी, बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत कोळीवली गावातील लोखंडे यांच्या घरात घडली. लोखंडे कुटुंब रविवारचा बेत आखून एकत्रित जेवण करण्यात मग्न होते. जेवण उरकल्यावर स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी घरातील एक महिला सदस्य गेली असता तिला भलामोठा साप कपाटातील भांड्याच्या मागे वेटोळे घालून बसल्याचा दिसला. या सापाला पाहताच त्या महिलेचा थरकाप उडाला होता. त्यांनी हॉलमध्ये धावत घेऊन घरातील इतर सदस्यांना स्वयंपाकघरात साप शिरल्याची माहिती दिली. त्या सापाच्या भीतीने संपूर्ण लोखंडे कुटुंबाने घराबाहेर धूम ठोकली होती.
दरम्यान, कुटुंब प्रमुख जयेश लोखंडे यांनी स्वयंपाकघरात साप घुसल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र हितेशला दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेशने स्वयंपाकघरातील कपाटात दडून बसलेल्या सापाला शिताफीने पकडले. त्यानंतर सर्पमित्र हितेशने कापडी पिशवीत या भल्यामोठ्या सापाला बंद केल्याने लोखंडे कुटुबांने सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून सुमारे 8 फूट लांबीचा आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून या सापाला जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली.
हेही वाचा - मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी