ठाणे - कळवा परिसरात भूस्खलन झाल्याने इंदिरा नगरामधल्या माँ काली चाळीतील सहा घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले होते.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केले. या घटनेत एकूण सहा घरांचे नुकसान झाले आहे. येथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या घटनास्थळावरील इतर रहिवाशांना देखील ठाणे महापालिकेच्या घोलाई येथील शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बचाव कार्य सुरूच आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.