ठाणे -कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी घरफोडीच्या तब्बल चौदा तर अँटी रॉबरी स्कॉडने चेन स्नॅचिंगचे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी सहा अट्टल आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या महिन्यात कल्याण पश्चिममधील ठाणगेवाडी परिसरात असणाऱ्या मेडिकलच्या दुकानात घरफोडी झाली होती. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन मोबाईल आणि पाचशे रुपये चोरले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर हे चौघे महात्मा पोलिसांच्या हाती लागले. तर किराणा दुकान, मेडिकल स्टोअर स्वीट मार्ट, कपड्यांचे दुकान आदी दुकानांचे शटर उचकटून हे आरोपी चोरी करत असल्याचे तपासाअंती समोर आले. या चौघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात ३, लाईन पोलीस ठाण्यात ५, विठ्ठलवाडीत २, कोळशेवाडीत २, मानपाडा आणि नाशिक येथे अंबड पोलीस ठाण्यात २ असे एकूण १४ घरफोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे पोलीस निरीक्षक संभाजी जाधव (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन नांद्रे हवलदार शिंदे पोलीस नाईक निकाळे आदींच्या पथकाने हा तपास केला होता. आरोपीकडून पोलिसांनी दोन मोटरसायकलींसह २ लाख ४१ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परिमंडळ तीनच्या अँटी रॉबरी स्कॉडने २ इराण्यांना बेड्या ठोकल्या असून चैन स्नॅचिंगचे सात आणि वाहन चोरीचे ३१० गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसांपूर्वी रॉबरी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीतून कासिम अफसर इराणी याला अटक केली होती. त्याच्या तपासात आरोपी कासिमने पॅकिंगच्या गुन्ह्याची कबुली देत या वस्तू विकणाऱ्या विरज की राणीची ही माहिती दिली. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात २, महात्मा फुलेत १, कोळशेवाडीत २, डोंबिवलीतील टिळकनगरमध्ये १, डोंबिवलीत १, मुंब्र्यात १, विठ्ठलवाडीत १, आणि खडकपाडात १, असे दहा गुन्हे दाखल आहेत. तसेच हा आरोपी ठाणे पोलिसांच्या टॉप-२० सोनसाखळीचोरांच्या यादीतील वाँटेड गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. मोक्का कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये तो सध्या जामिनावर सुटला असून त्याची आई दोन भाऊ, बहिणीही या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे. ही कारवाई रॉबरी स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनिल पवार, पोलीस नाईक दीपक घाडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, रवींद्र हासे चिंतामण कातकडे, सुनील गावित, आदींच्या पथकाने केली. या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीन महागड्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.