नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे, कित्येक देशात कोरोनाच्या लसीचा शोध लावण्यास शास्त्रज्ञ सक्रिय झाले होते, त्यात यशस्वीही झाले. भारतात सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनाच्या लसीचा शोध लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार 16 तारखेला देशभरात पहिल्या टप्प्यात लसीकरण पार पडले. मात्र, ही लस घेतल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 11 जणांना दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
11 जणांना लसीचे जाणवले साईड इफेक्ट
केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार 16 जानेवारीला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना 'कोव्हिशील्ड' लस देण्यात आली. यामध्ये रजिस्टर झालेले आणि रजिस्टर नसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील लस देण्यात आली. मात्र, कोरोनाच्या लसीकरण मोहिमेनंतर अवघ्या दोन दिवसातच या लसीचे साईड इफेक्ट समोर आले आहेत.
हेही वाचा - डी-मार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन लहान मुलांसह १३ जणांना केले रेस्क्यू
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लस देण्यात आलेल्या 200 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 11 कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट झाले आहेत. कर्मचाऱ्यांना एमजीएम आणि येरळा हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली होती. यात एका महिलेला अधिक त्रास जाणवू लागला, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
लस घेतल्यानंतर जाणवतोय 'हा' त्रास
कोरोनाची कोव्हिशील्ड ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे. साईड इफेक्ट सौम्य प्रकारचे असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 11 कर्मचाऱ्यांना एक दिवसानंतर काही सौम्य प्रकारचे साई़ड इफेक्ट जाणवू लागले आहेत. मात्र, लसीकरणानंतर सौम्य प्रकार दिसून येणे, हे स्वाभाविक आहे. या मध्ये काही घाबरण्यासारखे नाही, अशी माहिती पनवेल मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांनी दिली.
हेही वाचा - ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपचा बोलबाला; मात्र सरपंच निवडीनंतरच स्पष्ट होईल चित्र