ठाणे - कल्याणमध्ये एका व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली. मुद्स्सर मजीद असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यवासायिकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालायत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 2 अज्ञात हल्लेखारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
हेही वाचा - 'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम
कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात राहणारे व्यावसायिक मुद्स्सर मजीद हे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका रिक्षात बसून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. त्यावेळी वालधुनी पूल ओलांडल्यानंतर मुद्स्सर यांनी आपली रिक्षा थांबवून रिक्षा चालकाला समोरच्या दुकानातून एक सिगारेट आणण्यास सांगितले. याच दरम्यान पल्सर दुचाकीवरून 2 अज्ञात शुटर तोंडवार रुमाल बांधून आले. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवून जवळ येताच त्यामधील एका शूटरने मुद्स्सरवर गोळीबार केला. गोळीबारात मुद्स्सर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्याचे पाहून हल्लेखोर फरार झाले. मुद्स्सर यांच्या हाताला पायाला 2 गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर कल्याणातील श्रीदेवी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - खळबळजनक! सीएनजी गॅस भरताना पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट
या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांच्या हाती 1 सीसीटीव्ही फुटेज लागले असून या फुटेजमध्ये गोळीबार करणारे हल्लेखोर पल्सर दुचाकीवरून येताना दिसत आहेत. दरम्यान, जखमी मुद्स्सर यांचा नातेवाईकांसोबत संपत्तीचा वाद सुरू आहे. तसेच आणखी काय कारणाने गोळीबार झाला या अंगाने देखील पोलिसांनी तपास सुरू आहे. हल्ला का व कुणी केला ? हे अद्यापही अस्पष्ट असून गोळीबाराचे कारण शुटर पोलिसांच्या तावडीत सापडताच स्पष्ट होणार आहे.