ठाणे- महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीला संपूर्ण महाराष्ट्रातून मदत पूरविली जात आहे. ठाण्यातूनही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध उपयोगी वस्तुंचे तब्ब्ल 8 ट्रक पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे ट्रक रवाना करण्यात आले.
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय पथकांना देखील रवाना करण्यात आले. यातील 100 डॉक्टरांचे पथक पूरग्रस्तांवर उपचार करणार आहेत. पूरग्रस्त भागात डेंग्यू, कॉलरा, टायफाईडचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. त्यामुळे रुग्णांना लागणारी सर्व औषधे, उपचारासाठी लागणारी साधने तज्ज्ञ डॉक्टरांसोबत पाठविले असून तेथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूदेखील देण्यात येणार आहे.
ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुढाकार व शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 70 डॉक्टरांचे पथक, पूरग्रस्त कोल्हापूर - सांगलीच्या दिशेने रवाना झाली आहे. ही वैद्यकीय पथक विविध भागात पुरग्रस्तांची तपासणी आणि औषध पुरवठा करणार आहेत. सोमवारपासून सलग पाच दिवस कराड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महाआरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी करण्याबरोबरच गरजू रुग्णांना दहा कोटी रुपये किंमतीची मोफत औषधेही देण्यात येतील.