ठाणे - भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. तसेच राजकारणात कुणीही कुणालाही भेटु शकतो. कुणी कुणाला भेटावे, यावर बंदी नाही, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेत नवनिर्वाचित सभागृह नेते अशोक वैती यांना शुभेच्छा देण्यासाठी शिंदे येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या वावडया उठत आहेत. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, खडसे हे सर्वांचेच मित्र आहेत. अनेकांसोबत त्यांनी एकत्र काम केलेले आहे. तसेच त्यांचे हे अनेक वर्षांचे स्नेह संबंध आहेत. त्यामुळे खडसे-पवार भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. तसेच लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावे यावर बंदी नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - राम नाईकांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पकडले कैचीत, शिवाजी महाराजांबद्दल केली 'ही' मागणी
खातेवाटपाबाबत ते म्हणाले, लवकरच खाते वाटप बाबत मुख्यमंत्री उद्धव सांगतील. याबाबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. तर याठिकाणी कुस्त्या खेळायच्या नाहीत आणि राज्य सरकारने कोणत्याही विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही, तर आढावा घेण्याचे काम सुरू आहे असे सांगत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. याबरोबरच शिंदे यांनी 170 चा आकडा आमच्याकडे आहे, भविष्यात हा आकडा आणखी वाढेल आणि उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यावर महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली आहे, असे सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनादेखील प्रत्युत्तर दिले.