ठाणे - अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी येथील श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आहे. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना आयटी सेलने केली आहे.
मुंबईतील आर्थिक केंद्र तसेच मोठी कार्यालये गुजरातमध्ये हलवण्यात आली आहेत. आता मुंबईची शान असणारे बॉलिवूड इतर कुठे हलवण्याचा कट तर, मुंबईद्रोही लोक किंवा एखादा राजकीय पक्ष शिजवताना दिसत नाही ना? याचा सखोल शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चौकशीत कंगनाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे निष्पन्न झाले तर, शिवसेना तिचा मोफत उपचार करून देईल, असेही आयटी सेलने जाहीर केले.
कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून फक्त मुंबईचा अपमान नाही केला तर, मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचाही अपमान केला आहे, असे स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर म्हणाले. कंगनाविरोधात तक्रार दाखल करताना एकनाथ भोईर यांच्यासह माजी परिवहन सभापती दशरथ यादव, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा आयटी सेना संघटक अॅड. शैलेश कदम हे उपस्थित होते.