ठाणे - शिवभोजन थाळी योजना ही क्रांतिकारी सुरुवात आहे, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त आहे. राज्यभरात रविवारी शिवभोजन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. जिल्ह्यातही शिवभोजन केंद्रांचे उद्घाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ठाण्यात 2 ठिकाणी शिवभोजन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या थाळीची किंमत फक्त 10 रुपये आहे. या थाळीत 2 चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि भात असा मेनू आहे. सर्व शिवभोजन केंद्रावर सर्वसामान्यांसाठी ही योजना महिला बचत गटांना देण्यात आली आहे. सर्वांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे, हा या योजनेचा उद्देश आहे आणि हे जेवणही अतिशय उत्कृष्ट आहे, असा दावा मंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
तसेच आता पर्यंतच्या इतिहासामधील हा क्रांतीकारक निर्णय असल्याचेही ते म्हणाले. हे सरकार आपले सरकार आहे, अशा प्रकारच्या नवनवीन योजना आम्ही आणू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
हेही वाचा - चव न चाखताच हिंगोलीत पालकमंत्र्यांनी केले शिवभोजन थाळीचे उद्घाटन
'अशी' मिळणार शिवभोजन थाली -
शिवभोजन थाळीकरिता कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. आधारकार्ड वगैरेदेखील गरजेचे नाही. एक मोबाईल अॅप आहे. यात जेवण घेणाऱ्यांचे नाव, नंबर आणि फोटो अपलोड केला जाईल. यानंतर पावती देऊन ग्राहकाला जेवण देण्यात येईल. मोबाईल नंबर ही पुरेसा आहे.
ठाणे जिल्ह्यातील एकूण ७ ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र -
- ठाणे- २
- भिवंडी-2
- वाशी- 1
- कळवा- 1
- भाईंदर- 1