ठाणे - इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपाचे 27 तर एमआयएमचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपाला 30 मते मिळाली.
बंडखोरांना ठेवले होते हॉटेलात
जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षात भाजपाची सत्ता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र असे असतानाही भाजपाचे नगरसेवक फोडण्यात शिवसेना यशस्वी झाली. या सर्व ३० बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ठेवण्यात आले होते. येथूनच ऑनलाइन पद्धतीने मतदान पार पडले. त्या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. जळगावप्रमाणेच ठाण्यातील हॉटेलमध्येही या निवडणुकीनंतर शिवसेनेने मोठा जल्लोष साजरा केला.
एकनाथ शिंदे यांनी पार पाडली जबाबदारी
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी नगरसेवकांची जबाबदारी घेतली होती.त्यामुळेच सांगली महानगरपालिकेनंतर भाजपाला जळगाव महानगरपालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांचीही मेहनत आहे, असे स्थानिक नेत्यानी सांगितले. जैसी करनी वैसी भरनी, असे नेहमीच आपण पाहतो भाजपाचे गिरीश महाजन यांचे असेच झाले आहे. जळगाव नाही तर धूळगाव झाले होते. कोणताच विकास नाही म्हणून लोकांसाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. पहिल्यांदा जळगाव पालिकेवर सेनेची सत्ता आल्यामुळे आनंदच आहे, लोकांना सेनाच हवी होती, असे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.