ठाणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात शिवसेना भाजपचा बोलबाला दिसून आला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी आमचेच वर्चस्व असल्याचा दावा केला. काही ठिकाणी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी आणि मनसेने निर्वाचित बहुमत मिळवून काही ग्रापंचायतींवर कब्जा केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल उधळून ग्रामीण भागातील भाजप-सेनेच्या वर्चस्वला धक्का दिला आहे. तर, जिल्ह्यात यावेळी बहुसंख्य ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक आघाडीकडून लढविल्या असल्याने सरपंच निवडीनंतर सत्ता कोणत्या पक्षाची हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - ठाणे : गंभीर गुन्हे घडलेल्या चारही ग्रामपंचायतीचे निकाल 'धक्का' देणारे..
भिवंडीत मनसेच निर्णायक यश, भाजपला धक्का
भिवंडीतील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले असून ३० ग्रामपंचायतींवर भाजपचा वरचष्मा असल्याचा दावा भाजप खासदार कपिल पाटील यांनी केला. तर पडघा ग्रामपंचायत निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना शिवसेनेने यश मिळविले. तर, मनसेने निर्णायक यश मिळविले असून भाजपला धक्का दिला आहे.
शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळवले
५६ तालुक्यातील निकालात शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळविले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन, काँग्रेस ने एक, तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला आहे. तर, खासदार कपिल पाटील यांच्या दिवे अंजूर गावात त्यांना सत्ता राखण्यात यश आले. परंतु, शेतकरी संघटनेने त्यांना कडवी लढत देत तीन सदस्य निवडून आणले आहेत.
खारबाव ग्रामपंचायतीत राष्ट्रावादीची एकहाती सत्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खारबाव ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता प्रस्थापित करीत भाजप, सेना, मनसे पुरस्कृत उमेदवारांचा पराभव केला आहे. खारबाव ग्राम पंचायतीचे सर्व १३ उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले आहे. या शिवाय मालोडी व निंबवली या गावात देखील राष्ट्रवादीने सत्ता मिळविली असून, काँग्रेस पक्षाचे दयानंद चोरघे यांनी सरवली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली असून तेथे भाजप शिवसेना यांचा पराभव झाला आहे.
राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यावर गुलालाची उधळण
खारबाव ग्राम पंचायतीच्या अगोदर असलेल्या वडघर गावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ता महेंद्र पाटील पोहोचले असता कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर गुलाल उधळला व एकच जल्लोष केला. जेसीबीने गुलाल उधळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मुरबाडमध्ये भाजप - महाविकास आघाडीमध्ये दावे प्रतिदावे
मुरबाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ३२ जागांवर दावा केला आहे, तर भाजपच्या नेत्यांनी ३७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. मुरबाड तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींपैकी निवडणुकीपूर्वी ५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, तर प्रत्यक्षात ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून त्यांचा आज निकाल लागला. त्यामध्ये शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ३२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. अशी माहिती सुभाष पवार व तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांनी दिली. तर सत्ताधारी भाजप पक्षाने ४४ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती या आमच्याच पक्षाच्या आल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी दिली. परंतु, या दोन्ही पक्षाच्या वतीने केलेले दावे-प्रतिदावे हे मात्र सरपंच पदाच्या निवडीनंतरच स्पष्ट होईल. परंतु, सद्या तरी भाजप व महाविकास आघाडीचे दावे-प्रतिदावे गुलदस्त्यात असल्याचे दिसून येते.
शहापूरमध्ये राष्ट्रवादी ३, तर शिवसेनेचा ४ ग्रामपंचायतीवर दावा
पाच ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर करण्यात आले असून राष्ट्रवादीने तीन तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने दहिवली, चेरपोली, आल्यानी तर शिवसेनेने चेरपोली, डोलखांब, भावसे, आल्यानी ग्रामपंचायतींवर परस्पर विरोधी दावे केले आहेत. शहापूर तालुक्यात मागील वर्षीच्या मुदत संपलेल्या, परंतु कोरोना महामारीमुळे पुढे ढकललेल्या दहीवली, चेरपोली, आल्यानी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले होत. यामध्ये १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये दहिवली ६, चेरपोली ३, आल्यानी ५, भावसे १, डोळखांब ४ असे बिनविरोध झाले. उर्वरित ३२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या ७१ उमेदवारांमध्ये ३५ महिला उमेदवार, तर ३६ पुरुष उमेदवार निवडणूक लढवत होते.
बलाढ्य उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला
आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. सहाव्या वेळी निवडणूक लढविणारे उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुख्य म्हणजे, मागीलवर्षी घरकुल मंजूर न झाल्याने या ग्रामपंचायतीतील कोणत्याही लाभार्थ्याला घरकुल देता आले नाही. तर, पाणी पुरवठा हा कळीचा मुद्दा अनेक ग्रामपंचायतींमध्ये बनला होता. तर, चेरपोली ग्रामपंचायतीत जगदीश पवार हे तालुक्यात सर्वधिक मतांनी निवडून आले असून त्यांना ६९७ इतकी मते मिळाली आहेत. तर, ज्योती म्हसकर व अश्विनी फराड यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने ज्योती म्हस्कर विजयी झाल्या. तर, धीरज झुगरे यांचा चार मतांनी पराभव झाला. त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करूनही निकाल कायम राहिला.
अंबरनाथमध्ये पुन्हा सेनेची सरशी
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा सेनेची सरशी पाहायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात स्थापन झाल्यानंतर ही पहिली ग्रामपंचायत निवडणूक होती. अंबरनाथ तालुक्यात महाविकास आघाडीने २७ पैकी १९ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर, भाजपनेही ७ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. तालुक्यात शिवसेनेने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ ग्रामपंचायतीमध्ये स्पष्ट विजय मिळवला आहे. तर, काकोळे ग्रामपंचायतीमध्ये मनसेने आपले खाते उघडले आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग ३ ग्रामपंचायतीमध्ये यशस्वी ठरला आहे. एकंदरीत शिवसेनेने आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे.
कल्याणमध्ये भाजप - महविकास आघाडी सत्ता स्थापनेसाठी चढाओड
कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. पैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे, २० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आज सकाळी कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेसने महाआघाडी पुरस्कृत उमेदवारांची थेट भाजप पुरस्कृत उमेदवाराबरोबर लढत होती. अत्यंत चुरशीच्या या लढतीत २० ग्रामपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारांनी ९ ठिकाणी, तर भाजप पुरस्कृत उमेदवारांनी ११ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवले.
मनसे पुरस्कृत ४ उमेदवारांची निवड
खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडत या ठिकाणी मनसे पुरस्कृत चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे, सरपंच पदासाठी चढाओड होणार आहे. म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांपैकी महाविकास आघाडी ७, तर भाजप ७ जागांवर निवडून आली असून, तीन जागांवर टीम ओमी कलानीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे, या ठिकाणी टीम ओमी कलानीची भूमिका निर्णायक आहे. चोख पोलीस बंदोबस्त असल्याने मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही आकडेवारी असली तरी सरपंच पदाचे आरक्षण पडल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत, हे चित्र स्पष्ट होणार.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांची काही वेळातच सुरुवात; सेना-भाजपामध्येच टक्कर