ठाणे - भाजप - शिवसेनेत (BJP-Shivsena) दीड वर्षांपासून राजकीय वैर होऊन २५ वर्षाच्या युतीचा राजकीय संसार मोडला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) झाले. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत आणखीच राजकीय दुरावा निर्माण झाला. मात्र, भिवंडी महापालिकेच्या (Bhiwandi Corporation) स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाशी छुपी युती करून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे, काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असूनही दारुण पराभव झाल्याने शिवसेना -भाजपाची अभद्र युती केवळ आर्थिक हित जोपासण्यासाठी झाल्याचा आरोप पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवाराने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी ४ महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
२ सदस्य असलेल्या शिवसेनेने पटकवाले सभापती पद-
यापूर्वी २०१९ मध्ये महापौर निवडणुकीत कााँग्रेसचे १८ तर आता स्थायी समिती सभापती निवडणुकीत पुन्हा कॉग्रेसच्या ६ नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. यामुळे शहरात काँग्रेसची पुरता वाताहात झाली आहे. एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना तब्बल १४ तर काँग्रेसचे उमेदवार अरुण राऊत यांना केवळ दोनच मते मिळाली आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे . शिवसेनेच्या संजय म्हात्रे यांना सेनेची २ मते, कोणार्क विकास आघाडीची २, भाजप ४ तर काँग्रेसच्या सर्वाधिक ६ सदस्यांनी मतदान केल्याने म्हात्रे यांचा विजय झाला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली-
भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत प्रदेशाध्यक्षांच्या पक्षादेशाला केराची टोपली दाखवत सेनेच्या उमेदवाराला विजयी केले आहे. विशेष म्हणजे शिवसेना उमेदवाराला भाजपाच्या सदस्यांनीही युती करीत स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसला लाथाडून भाजपशी युती केल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेचे संजय म्हात्रे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे आगामी महापालिकेच्या अंतिम टप्यात राज्यभर युतीत असलेल्या काँग्रेसला विरोध करत भाजपला जवळ केल्याने शिवसेनेने काँग्रेसलाचं नामोहरम केले आहे.
महापालीकेच्या स्थापनेपासून घोडेबाजाराला ऊत -
२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेसची एकाहाती सत्ता होती. विशेष म्हणजे कॉग्रेसकडे बहुमत असताना देखील काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली होती. त्यानुसार उपमहापौर पद शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र त्यांनतर २०१९ मध्ये महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडी व भाजपा सोबत युती केल्याने काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्याच बंडखोरीची पुनरावृत्ती पालिका सभागृहात होत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस गटनेता हलीम अन्सारी यांना काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर ही स्वतः स्थायी समिती सदस्य असणाऱ्या खुद्द काँग्रेसच्या गटनेत्यानेच पक्षाआदेशास केराची टोपली दाखवीत तयांच्यासह ६ काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात आपले मतदान केले. एकंदरीतच २००१ साली महापालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आर्थिक घोडेबाजारामुळे कॉगेस केवळ नावापुरती राहिल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेकडूनच काँग्रेसला संपविण्यासाठी खेळी?
भिवंडी महानगरपालिका सभागृहात काँग्रेस बहुमताने सत्तेत असतानाही काँग्रेस पक्षाचा पराभव घोडेबाजारीच्या बंडखोरीतून झाला असून त्यामध्ये मोठी आर्थिक हितसंबंध जोपासले आहे. विशेष म्हणजे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या काँग्रेस गटनेता सह सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असून शिवसेनेने शहरातील काँग्रेस संपविण्यासाठी हि खेळी केली असावी अशी प्रतिक्रिया पराभूत काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांनी दिली आहे.