ठाणे - विधानसभा निवडणूक जवळ येत असताना राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग येत आहे. बदलापूर येथे अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीचा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. यातून शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे कार्यालय फोडले. या तोडफोडीमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
हेही वाचा - LIVE : 'लालबागचा राजा' विसर्जन मिरवणुकीला लवकरच होणार सुरुवात
बदलापूरमधील शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यावरुन झालेल्या वादात शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे बोलले जात आहे. बदलापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना नेत्यांशी जवळीक साधण्याचीही चर्चा आहे. आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे हे जुने कट्टर विरोधक होते. मात्र, मागील काही काळात ते जवळ आल्याचे पाहायला मिळाले. कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथ भागात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मदभेद असल्याचे बोलले जाते.
मागील अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये विद्यमान आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेने या वर्चस्वाला आव्हान देत बदलापूर नगरपालिकेवर ताबा मिळवला. यासाठी शिवसेनेकडून आमदार कथोरे यांच्यावर जोरदार टीकाही झाली. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही आमदार कथोरे यांच्यावर शहरात एकही काम नीट न केल्याचा आरोप केला होता. मागील काही महिन्यांपासून मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले कथोरे आणि म्हात्रे आता अगदी मित्रांप्रमाणे वावरताना दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात बदलापूर विधानसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार आणि तेथील उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मात्र टोकाचे मतभेद झालेले दिसत आहेत. त्याचे रुपांतर आज थेट तोडफोडीत झाले.