ठाणे : पालघर जिल्हा असो की, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ या चारही तालुक्यातील बहुतांश आदिवासी गावपाडे डोंगराच्या कुशीत वर्षोनुवर्ष वसलेले आहेत. या पाड्यातील गावकरी आपल्या पाड्यात राहणाऱ्या गरोदर माता, आजारी रुग्ण, वृध्द व्यक्ती यांना पावसाळा संपेपर्यंत आपल्या नातेवाईकांकडे पाठवतात. कारण रात्री बेरात्री आजारी व्यक्तीस किंवा गरोदर मातेस ३ किलोमीटर बांबूच्या डोलीने पायपीट करत रुग्णालयात घेऊन जावे लागते.
आदिवासी पाडे सुविधांपासून वंचित आहेत : जिल्ह्यातील शेकडो आदिवासी पाडे हे, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधांपासून वंचित आहेत. गरोदर माता, आजारी रुग्ण यांना वैद्यकीय उपचारासाठी जंगल दऱ्या खोऱ्यातून चिखल तुटवत बांबूची डोली करून, ४ किलोमीटर दूरवर पायपीट करावी लागते. त्यानंतर तिथून पुढे एखाद्या वाहनाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येते. पावसाळा असल्याने नद्या ओढ्याना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश गाव पाड्यात आरोग्य सेवा पोहचणे अशक्य झाले आहे. तसेच शेतीची कामे सुरू आहेत. यामुळे शहापूर तालुक्यातील सावरखूट गावातील गावकऱ्यांनी आपल्या पाड्यात असलेल्या गरोदर माता, आजारी व्यक्तींना आपल्या नातेवाईकांकडे पाठविले आहे.
डोलीने रुग्णालयात घेऊन जावे लागते : शहापूर तालुक्यातील सावरखूट आदिवासी पाड्यात रहाणारी राणी युवराज वारे या गरोदर मातेने, समाजमाध्यमावर व्हिडिओ व्हायरल करून स्वतःची सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात की, गावात रस्ता नाही, दुसरी कोणतीही सुविधा नाही यामुळे गरोदर महिलांना डोलीने पायपीट करत रूग्णालयात घेऊन जावे लागते. गरोदर महिलांना डोली करून घेऊन जाण्यासाठी गावात माणसे शोधावी लागतात. त्यातच एक दोन तास निघून जातात. अर्ध्या रस्त्यापर्यंत डोलीने पायपीट करत घेऊन गेल्यावर वाहन मिळेलच याची शाश्वती नसते. यामुळे नातेवाईकांकडे राहावे लागते, असे गरोदर माता राणी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -
- Thane Flood : मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी मंजुरीसाठी पत्र दिलेला पूल कागदावरच; झोळी करुन महिलांनी न्यावे लागते रुग्णालयात!
- Palghar Flood : गरोदर महिलेचा रस्त्याअभावी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास; पालघरमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ
- Tribal People Issues: रस्ता नसल्याने गरोदर महिलेला झोळीतून ६ किमी नेले! प्राथमिक सुविधा नसल्याने आदिवासींचे हाल