मिरारोड - मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा-भाईंदर येथील एका पंचतारांकित हॉटेलला लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटने मेल पाठवून घातपात करण्याची धमकी दिली. लष्कर-ए-तोयबाने मेल करून 100 बीट कॉईन म्हणजे 7 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बुधवारी सकाळी मीरारोड येथील माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लबच्या इमेल आयडीवर लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेचा मेल आल्याने एकच खळबळ माजली. कर्मचाऱ्याने इमेल पाहून मालक नरेंद्र मेहता यांना या संदर्भात माहिती दिली. नरेंद्र मेहता त्यांनी लागलीच पोलिसांना कळवले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हॉटेल संपूर्ण कारभार थांबवत झाडझडती सुरु केली.
संबधीत ई-मेल हा इंग्रजी भाषेत आहे. क्लब वाचवायचा असेल तर, २४ तासांच्या आत ७ कोटी रुपये खात्यावर जमा करा, असंही मेलमध्ये म्हटलं आहे. 24तासाच्या आता जर आम्हाला पैसे मिळाले नाही तर हॉटेलमधील ग्राहकांना बंदी बनवून सर्वांचा जीव घेऊ. जर घातपात झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असणार, आम्ही अल्लाह च्या नावाखाली मारायला तयार आहोत आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, अशा प्रकारची धमकी या इमेल मध्ये देण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी यांनी माहिती दिली आहे की, सदरचे प्रकरण आम्ही गंभीरतेने घेतले असून या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबधीत इमेल कुठून आला आणि त्यामागे कोण आहेत याचा शोध आम्ही घेत आहोत. याच प्रमाणे मुंबईच्या आणखी दोन पंचतारांकित हॉटेलला सुद्धा अशाच प्रकारे धमकीचा मेल आल्याची माहिती मिळत आहे.